रमी सर्कल गेम मुळे बरेच तरुण या व्यसना आदानी झाले आहेत | rummycircle important notes |

 रमी सर्कल गेम मुळे बरेच तरुण या व्यसना  आदानी झाले आहेत | rummycircle important notes |

 

“रमी खेळा आणि पैसे जिंका दिवसरात्र दिसणाऱ्या या जाहिरातीने तरुणांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रमी खेळण्याचे वेड लावले आहे. तरुण पोर मैदानातले खेळ सोडून ऑनलाईन गेम खेळण्यात गुंग झाले आहेत. तरुणांच्या जवळ असलेल्या  मोबाईल मध्ये काही असो किंवा नसो पण एखादा तरी गेम असतोच. त्यात रमी तर हमखास दिसणार..! ‘तीन पत्ती गोल्ड’ हा रमी गेम ५० मिलियन म्हणजे तब्बल पाच कोटी लोकांनी डाऊनलोड केला आहे तर जंगली रमी १० मिलियन म्हणजे एक कोटी लोकांनी डाऊनलोड केला आहे. हे रमी गेम मधल्या फक्त दोन अपचे उदाहरणे आहेत. फक्त रमी गेम खेळण्याचे शेकडो अप आहेत. प्ले स्टोअर वर नुसतं रमी म्हणून टाकलं की लगेच मोठी लिस्ट येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं ऑनलाईन रमी गेमच्या आहारी गेले आहेत. या रमी सारख्या गेमचे अनेक परिणाम आपल्या समाजावर होत आहेत…

 

१) रमी गेम मुळे होणाऱ्या आत्महत्या –

काही महिन्यापूर्वी तामिळनाडू राज्यात एका पोलिसाने लाखो रुपये ऑनलाईन रमी खेळण्यात घालवले आणि नंतर आत्महत्या केली. अशी एक बातमी आली होती. या व्यक्तीने रमी खेळण्यासाठी तब्बल २० लाख रुपये उदार घेतले होते आणि ते पैसे रमी गेम मध्ये हरल्याने त्या पोलिसाने स्वतःलाच गोळी मारून घेतली. पोलिसांची ही अवस्था असेल तर विचार करा. बाकी सामान्य लोकांचे काय हाल होत असतील? दुसरी एक बातमी बँक कर्मचाऱ्याची आहे. हा २८ वर्षीय बँक कर्मचारी खूप रमी खेळत असे. सुरवातीला या व्यक्तीने रमी खेळातून पैसे जिंकले. या कारणामुळे अजून रमी खेळण्याचा नाद लागला. हा नाद इतका लागला की त्याचे व्यसन झाले. नंतर हळूहळू हा पैसा हरायला लागला. त्यातून ताण- तणाव इतके वाढत गेले की या व्यक्तीनेही आत्महत्या केली. हे आपल्यासमोर आलेले दोन प्रकरणे आहेत. अजून अशा किती घटना घडत असतील. याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. 

२) ऑनलाईन गेमचे शारीरिक परिणाम –

रमी सारख्या ऑनलाईन गेम मुळे आत्महत्या करणे हे एक हिमनगाचे टोक आहे. त्याखाली माणसाची जी अवस्था होत आहे, ती भयंकर आहे. तासन तास मोबाइलवर हा खेळ खेळला जात असल्याने हजारो लोकांना तरुण वयात मानदुखीचा, डोकेदुखीचा प्रचंड  त्रास जाणवू  लागला आहे. काहींच्या डोळ्यांवर देखील परिणाम झाला आहे. एवढेच नव्हे तर तासनतास मोबाइलवर खेळ खेळल्याने तरुणांच्या बोटांच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. हे लक्षणे पोलिसांच्या चौकशीत आढळून आले आहेत.

 

३) सामाजिक परिणाम –

वरील सर्व प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारे, जाणवणारे उदाहरणे आहेत पण अशा गेम मुळे कधीही भरून न निघणारे असे सामाजिक नुकसान होत आहे. आपला समाज हा एकमेकात मिसळणारा समाज आहे, एकमेकांशी संवाद साधणारा समाज आहे. हजारो वर्ष आपण एकमेकांची विचारपूस करत आलो आहोत. आता अशा गेम मुळे लोकं एकमेकांपासून दूर होत चालले आहेत, संवादाची माध्यमे वाढली आहेत पण संवाद नाहीसा होत चाललेला आहे. ज्या माध्यमाने संवाद वाढायला हवा होता, एकमेकांशी जवळीक वाढायला हवी होती. तीच माध्यमे नात्यात भिंती उभ्या करत आहेत. शाळकरी पोरांनी, तरुणांनी दिवसरात्र मोबाईलच्या आभासी जगात स्वतःला कोंडून घेतले आहे. बाहेरच्या विश्वात काय होत आहे? याची कसलीही जाणीव नाही. बाहेरच्या जगाचे एकवेळ सोडून देऊ, स्वतः च्या कुटुंबातही संवाद राहिला नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत हाताची बोटे मोबाईलवर नाचत असतात. माणूस हा माणसापासून आणि स्वतःपासूनही दूर जातो आहे.  दुसऱ्याला जाऊ द्या, स्वतःला देण्यासाठी देखील वेळ राहिलेला नाही. पडणारा पाऊस, उमलणारे फुल, कोसळणारा धबधबा याचा आनंद घेणे, लोकं विसरून गेले आहेत. अशा निसर्गरम्य ठिकाणीही लोकं जातात तेव्हा फोटो काढतात किंवा गेम खेळत बसतात. मैदानी खेळ खेळणे, किल्ले बनवणे, पुस्तक वाचणे, फुले गोळा करणे, जंगलात फिरणे असे छंद आता इतिहासात जमा झाले आहेत. जगात एकच आणि एकच छंद उरलेला आहे, तो म्हणजे गेम खेळणे.

ऑनलाईन गेम खेळणे हा एकवेळ छंद असला असता तरी परवडले असते पण हे गेम म्हणजे जीवघेणा प्रवास झालेला आहे. छंद आपल्याला आनंदाने जगायला शिकवतात तर ऑनलाईन गेम हे व्यसन बनून स्वतःलाच आतल्या आत मारत असतात. आपल्यातली माणुसकी कधी मेली हे आपल्याला देखील कळत नाही. अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत की, मुलाच्या हातातील आईने मोबाईल हिसकावून घेतला म्हणून आईला मारून टाकले, बहिण- भावाला मारून टाकले. या गेमने लोकांचे दिवाळे तर काढलेच आहे सोबत माणुसकी देखील संपवून टाकली आहे. त्यात अजून वाईट म्हणजे बहुतांश शाळकरी विद्यार्थी देखील अशा ऑनलाईन गेमच्या आहारी गेले आहेत. शाळेची, बालपणाची मजा घेण्याऐवजी गेम मध्ये डोके खुपसून बसत आहेत. 

 

४ ) आयुष्य उध्वस्त करणाऱ्या गेम मधून बाहेर पडण्याचे उपाय-

अशा शाळकरी मुलांनी, तरुणांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, हे गेम म्हणजे तात्पुरती नशा आहे. काही वेळ मजा वाटते पण अशा गेम मुळे जीवन बरबाद होते. जाणीवपूर्वक अशा गेम पासून दूर राहायला हवे, असा कोणताही गेम मोबाईल मध्ये ठेवायला नको. पालकांनी देखील मुलांवर लक्ष ठेवायला हवे. सुरवातीच्या टप्प्यात आपण मुलांना समजावले, मुलांची शक्ती, बुद्धी योग्य दिशेला वळवली तर मुलेही गेमच्या नादाला लागणार नाहीत. हे जेवढे लवकर करता येईल, तेवढे लवकर करायला हवे, नाहीतर ते व्यसन झाल्यास खूप महागात पडते. 

तरुणांनी शॉर्टकट वापरून पैसे कमावण्याचा नादाला लागू नये. आपण शॉर्टकट वापरायला जातो आणि लॉंगटर्मच्या जाळ्यात अडकतो. आपल्या शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याचा महत्वाकांक्षेला ऑनलाईन गेम बनवणाऱ्या कंपन्या खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. आपल्या या कमजोरीचा फायदा घेऊन, हिरो- हिरोईनच्या माध्यमातून जाहिराती करून ते बरोबर आपल्यावर फास टाकतात. ज्यात आपण अडकतो. हा मोहमयी फास सुटता सुटत नाही. आपल्या जीवनाचे तीन- तेरा वाजवूनच तो फास मोकळा होतो, तोपर्यंत आपल्या हातातून सर्व काही निसटलेल असत, आपण काहीच करू शकत नाही. अशावेळी बरेच लोकं मग आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. यामुळेच वेळीच सावध व्हा आणि रमी सारख्या ऑनलाईन गेमला कोसो दूर ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *